पश्चिम बंगालच्या हावडा येथे एका निवडणूक प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी असे प्रतिपादन केले की भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार पाकव्याप्त जम्मू काश्मीर(POJK ) परत घेण्यास वचनबद्ध आहे आणि पाकिस्तान त्यासाठी आम्हाला अडवू शकत नाही.
“पाकव्याप्त काश्मीर आमचे नाही का ? पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे म्हणून मणिशंकर अय्यर आणि फारूक अब्दुल्ला हे घाबरवायचा प्रयत्न करतील आणि आम्ही पाकव्याप्त जम्मू काश्मीरबद्दल बोलूच नये, असा टोला त्यांनी काँग्रेसला हाणला आहे. तसेच राहुल बाबा, ममता दीदी, तुम्ही कितीही घाबरलात तरी पाकव्याप्त काश्मीर आमचे आहे आणि आम्ही ते परत घेऊ, असे शाह यांनी ठणकावून सांगितले आहे.
काश्मीरची भारतातली बाजू आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील फरक सांगताना शाह म्हणाले, “पूर्वी लोक काश्मीरच्या आमच्या भागात निदर्शने करत असत. आता पंतप्रधान मोदींच्या प्रभावाखाली, काश्मीरच्या त्या भारतीय भागात कोणतेही हरताळ पाळले जात नाहीत. पण पाकव्याप्त काश्मीरमध्ये याआधी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या जात होत्या, आणि अजूनही आता तिथे दगडफेक चालूच आहे.
केंद्रशासित प्रदेशात पर्यटन उद्योग वाढल्याबद्दल गृहमंत्री म्हणाले, “दोन कोटी पर्यटक काश्मीरमध्ये आले आणि एक नवीन विक्रम रचला गेला”.
कलम 370 रद्द करण्याबाबत बोलताना शाह म्हणाले, “ममता दीदी, काँग्रेस, आम्हाला कलम 370 हटवू नका असे सांगत होते. मी त्यांना संसदेत विचारले असता ते म्हणाले की असे झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील. पण हे पंतप्रधान मोदींचे सरकार आहे. पाच वर्षांनंतर रक्ताच्या नद्या सोडा, कोणीही आग लावण्याची हिम्मत केली नाही.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 रद्द केले आणि काश्मीरला उर्वरित भारतात विलीन केले,” असे ते पुढे म्हणाले आहेत.