दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर बाहेर आले असताना असताना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याच्या सीबीआयशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 30 मे पर्यंत वाढ केली आहे.
सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती, त्यानंतर त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. पण पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
आज राऊस एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सांगितले की, सीबीआय प्रकरणात मनीष यांच्यावर 30 मे रोजी आरोप निश्चित केले जातील.सिसोदिया यांनी आरोपांवरील चर्चा थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
7 मे रोजी झालेल्या सुनावणीत सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. तर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांची कोठडी 21 मे पर्यंत आहे.14 मे रोजी सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरही दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी निर्णय राखून ठेवल्याचे सांगितले.
सिसोदियांच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन आणि मोहित माथूर यांनी युक्तिवाद केला, तर ईडीच्या वतीने जोहेब हुसेन आणि सीबीआयच्या वतीने एसपीपी रिपुदमन भारद्वाज कृष्णन यांनी बाजू मांडली.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत मनीष सिसोदिया यांच्यसह 16 हायप्रोफाईल लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि बीआरएस नेते के. कविताही न्यायालयीन कोठडीत आहे. याच प्रकरणात आपचे नेते संजय सिंह देखील तुरुंगात होते.