पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे. ताडीवाला रोड भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत शंकरराव (मामा) सोनवणे यांच्या त्या कन्या होत्या.
भावाच्या अंत्यदर्शनाला त्या गेलेल्या असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.भाऊ आणि बहीण यांचे एकाच दिवशी निधन झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
शंकरराव सोनवणे यांनी देखील महापालिकेत प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या रजनी त्रिभुवन यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेवर बराच काळ नगरसेवक तसेच विविध समित्यांवर काम केले. पुण्याच्या बौद्ध समाजाच्या पहिल्या महिला महापौर म्हणून त्यांना (2004- 2006 ) सन्मान मिळाला होता. महापौर पदाच्या काळात त्यांनी पुणे शहराचे विविध समस्या मार्गी लावल्या. सभागृहातील ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांनी एक वेगळा दरारा निर्माण केला होता त्यासोबतच अनेक समाज उपयोगी निर्णय देखील त्यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कालावधीत घेतले होते. .शहरातील समस्या सोडवण्यासाठी पुण्यातील माजी महापौरांनी एक संघटना स्थापन केली होती, त्यातही रजनी यांचा सहभाग होता.