PM Modi On Shivsena Thackeray Group : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज दिंडोरीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणारच, असं मोठं वक्तव्य यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नकली शिवसेनेला अहंकार एवढा आहे की त्यांना महाराष्ट्राच्या लोकांच्या भावनांची पर्वा नाही. त्यांना काहीही फरक पडत नाही. पण काँग्रेससमोर गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचं मन संपूर्ण महाराष्ट्राने बनवलं आहे.”
“नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना यांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणं पक्क आहे. ज्यावेळी नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल. कारण बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, ज्यादिवशी शिवसेना ही काँग्रेस होईल असं वाटेल त्यादिवशी शिवसेना संपवून टाकेल. त्यामुळे नकली शिवसेनेचा पत्ता राहणार नाही आणि हा विनाश बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक दु:खी करत असेल”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
पुढे ते म्हणाले की, “मागील दहा वर्षात तुम्ही माझं काम पाहिलं आहे. आता मी तुमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. मी तिसऱ्या कार्यकाळासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. विकसित भारतासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.