पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज निवडणूक आयोगावर निशाणा साधत निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातातले बाहुले असून लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने केंद्रात सत्ता कायम ठेवली तर माझे अस्तित्व संपुष्टात येईल, असे म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनयातून राजकारणात प्रवेश केलेल्या रचना बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ हुगळीत एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना बॅनर्जी म्हणाल्या की, ‘भाजप पुन्हा सत्तेत आल्यास माझे अस्तित्व संपुष्टात येईल. तुमचे अस्तित्व संपुष्टात येईल. सामान्य लोकांचे अस्तित्व संपुष्टात येईल. अनुसूचित जाती-जमातींचे अस्तित्व संपुष्टात येईल. शेतकरी आणि मजुरांचे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे भाजपला प्रत्येक जागेवर पराभूत करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचाराभिमुख पंतप्रधान म्हणत मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांना स्वत:च्या प्रचाराशिवाय काहीच कळत नाही. ते दिलेले आश्वासन मोडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. तसेच सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे.
राज्यात अनेक टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांबाबतही त्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. ममता म्हणाल्या की, अधिकारी वातानुकूलित खोल्यांमध्ये बसले आहेत. या कडाक्याच्या उन्हात मतदानाच्या प्रदीर्घ तासांमुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास त्यांना कसा जाणवणार?
देशात एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स), सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि यूसीसी (एकसमान नागरी संहिता) ची अंमलबजावणी थांबवण्यासाठी भाजपविरोधातील प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, असा पुनरुच्चारही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या की, “भाजपला सत्तेतून बाहेर काढल्यास हे तीन कठोर कायदे देशात लागू केले जाणार नाहीत, हे माझे वचन आहे.”