PM Modi On Congress : आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांसाठी मतदान झाले असून आता अजून तीन टप्पे बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकच्या दिंडोरी येथे जाहीर सभेला संबोधित केले.
जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेस लोकसभा निवडणुकीत इतक्या वाईट रीतीने हरत आहे की त्यांना संविधानानुसार विरोधी पक्ष बनणेही कठीण होईल,” अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
पुढे त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या एका नेत्याने निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशी सूचना केली होती. म्हणजे नकली शिवसेना आणि बनावट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होतील. असे झाल्यावर मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वाधिक आठवण येईल. कारण शिवसेना काँग्रेस झाली असे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ते शिवसेनेला संपवतील असे बाळासाहेब म्हणायचे. म्हणजे आता खोट्या शिवसेनेचा मागमूसही लागणार नाही”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
एक किस्सा सांगताना पंतप्रधान म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना देशाच्या एकूण बजेटपैकी 15 टक्के मुस्लिमांवर खर्च व्हावा, अशी काँग्रेसची इच्छा होती. त्यावेळी मी त्याला कडाडून विरोध केला होता आणि संपूर्ण भाजपने निषेध केला. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.