दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याच्या सीबीआयशी संबंधित प्रकरणात
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीच्या
राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ३० मे पर्यंत वाढ केली आहे. आज सिसोदिया यांची
न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळे त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
न्यायालयात हजर करण्यात आले.
७ मे रोजी न्यायालयाने उत्पादन शुल्क घोटाळ्याच्या प्रकरणात सिसोदिया
यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. ईडीने ९ मार्च २०२३ रोजी चौकशीनंतर या
प्रकरणी मनीष सिसोदिया यांना तिहार तुरुंगातून अटक केली होती. सिसोदिया यांना
यापूर्वी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सीबीआयने अटक केली होती. मनीष सिसोदिया यांनी
दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे, ज्यावर दिल्ली
उच्च न्यायालयाने १४ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.
दरम्यान , दिल्लीतील दारू
घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया
यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने
मनीष सिसोदिया तसेच विजय नायर आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ८ मे २०२४
पर्यंत वाढ केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात
हजर करण्यात आले होते.