Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच निवृत्तीबद्दल बोलला आहे. काहीतरी अपूर्ण आहे या भावनेने करिअर संपवायचे नाही, असे तो म्हणाला.
एकदा निवृत्त झाल्यावर तो काही काळ कोणाला दिसणार नाही, असेही विराटने त्याच्या चाहत्यांना सांगितले. विराट कोहली यावर्षी नोव्हेंबरमध्ये 36 वर्षांचा होईल. पण तो त्याच्या उत्कृष्ट फिटनेसमुळे आणखी 2-3 वर्षे क्रिकेट खेळू शकतो.
जेव्हा विराट कोहलीला आरसीबी पॉडकास्ट दरम्यान विचारण्यात आले की, अशी कोणती गोष्ट आहे जी तुला अजूनही उपाशी ठेवते? तेव्हा त्याने उत्तर दिले की, “हे खूप सरळ आहे, मला वाटते की एक खेळाडू म्हणून आमच्या कारकिर्दीतील निवत्ती ही शेवटची तारीख आहे. हा विचार करून मला माझे करियर संपवायचे नाही.”
तो पुढे पुढे म्हणाला, “एकदा माझे काम झाले की, मी निघून जाईन, तुम्ही मला काही काळ बघू शकणार नाही. त्यामुळे मी खेळतो तोपर्यंत मला माझे सर्वस्व द्यायचे आहे आणि हीच गोष्ट मला पुढे ठेवते”, असेही विराट म्हणाला.
दरम्यान, आपल्या कारकिर्दीच्या या टप्प्यावरही विराट कोहली आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि फिटनेसच्या जोरावर तरुणांना कठीण आव्हान देत आहे. तो सध्या 661 धावांसह IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या लीगमध्ये देश-विदेशातील अनेक युवा खेळाडू सहभागी होत आहेत, मात्र विराटशिवाय अद्याप कोणालाही 600 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.