Adil Durrani On Rakhi Sawant : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतीच ती मुंबईत परतली असून अचानक तिची प्रकृती खराब झाली आहे. तसेच तिला तातडीनं रूग्णालयात देखील दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
काल (15 मे) राखीच्या प्रकृतीबाब माहिती देताना राखीचा माजी पती रितेश सिंगने सांगितले की, तिला छातीत तीव्र वेदना होत असल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच राखीची प्रकृती चिंताजनक असून तिच्या अँजिओग्राफीची तयारी सुरू असल्याचेही रितेशने सांगितले. मात्र, आता राखीचा माजी पती आदिल खान दुर्रानी याने राखीच्या आजाराला ड्रामा म्हटले आहे. केवळ तुरुंगात जाऊ नये म्हणून राखी हे सर्व करत असल्याचा दावाही त्याने केला आहे.
आदिल दुर्रानीने न्यूज 18 शोषाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राखी सावंत लीक व्हिडिओ प्रकरणात तुरुंगात जाऊ नये म्हणून हे सर्व करत आहे. तिचा काहीच वैद्यकीय अहवाल नाही, डॉक्टर काहीच बोलले नाहीत. ती कोणत्या रुग्णालयात दाखल आहे, हे आम्हाला माहीत नाही. जर हृदयाशी संबंधित काही समस्या असेल तर मला वाटते की रुग्णांना ऑक्सिजन मास्कची आवश्यकता असते, परंतु तिला तर तसं काहीही लावलेलं नाही. तिला लवकरच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागणार असल्यानेच ती हे करत आहे. तुरुंगात जाऊ नये म्हणून हे नाटक आहे, असं आदिल म्हणाला.
दुसरीकडे राखीच्या आजाराबाबत रितेशने न्यूज 18 शोशाला दिलेल्या मुलाखतीत असेही सांगितले होते की, राखीला छाती आणि पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याने दावा केला की, काही चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांना तिच्या गर्भाशयात एक ट्यूमर सापडला. रितेशच्या म्हणण्यानुसार त्याला राखीला कॅन्सर झाल्याचा संशय आहे. अशा परिस्थितीत रितेशचे म्हणणे ऐकून आदिल म्हणाला, “असे काहीही नाही, कारण जेव्हा मी राखीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा तिची पूर्ण बॉडी टेस्ट झाली होती. तिला काहीही अडचण नव्हती”, असंही आदिलने सांगितले.