Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेदरम्यान एक मोठी घटना घडली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून वादळी वारे आणि जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांनाही बसला आहे. अवकाळी पावसामुळे अनेक नेत्यांच्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत.
एकिकडे राजकीय नेत्यांना त्यांच्या सभा रद्द कराव्या लागत आहेत तर दुसरीकडे मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एक महाकाय बॅनर कोसळून मोठी दुर्घटना घडली. तर आता याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं आज पाहायला मिळालं. आज शरद पवारांच्या सभेतही वादळी वाऱ्यामुळे बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सटाणा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असताना अचानक वादळी वारा सुरू झाला. मात्र, तरीही शरद पवारांनी आपलं भाषण सुरू ठेवलं होतं. पण यावेळी अचानक व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं व्यासपीठावर जे कार्यकर्ते होते त्यांनी हा बॅनर वरचेवर घेतल्याने अनर्थ टळला. त्यामुळे या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.
बॅनर कोसळल्याची ही घटना घडताच शरद पवारांनी आपलं भाषण उरकतं घेतलं. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.