ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca च्या धक्कादायक खुलाशानंतर कोरोना लसीबद्दल बरीच चर्चा होत आहे. न्यायालयात AstraZeneca ने कबूल केले आहे की, कोविशील्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) दुर्मिळ प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसिस होऊ शकते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. तसेच बऱ्याच गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. या धक्कादायक खुलाशानंतर भारतातही एकच खळबळ उडाली आहे.
Covishield नंतर आता Covaxin च्या दुष्परिणामांबाबत एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्प्रिंगरलिंकवर प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, किशोरवयीन मुलींना आणि ज्यांना पूर्वी ऍलर्जी होती त्यांना कोवॅक्सिन घेतल्यानंतर AESI होण्याचा धोका जास्त असतो.
स्प्रिंगरलिंकवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारत बायोटेकच्या कोविड-19 लस, कोवॅक्सिनच्या दुष्परिणामांवरील अभ्यासात एक तृतीयांश सहभागींमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया (AESI) आढळून आल्या. अहवालानुसार, संशोधकांना असे आढळून आले की, किशोरवयीन मुली आणि ज्या लोकांना यापूर्वी ऍलर्जी होती त्यांना Covaxin घेतल्यानंतर AESI होण्याचा धोका जास्त असतो. बनारस हिंदू विद्यापीठातील शंखा शुभ्रा चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, अभ्यासात समाविष्ट केलेल्या एका वर्षाच्या फॉलोअप दरम्यान बहुतेक AESI टिकून राहिले.
अभ्यासातील 1,024 सहभागींपैकी 635 किशोरवयीन आणि 291 प्रौढांना 1 वर्षाच्या फॉलोअप दरम्यान संपर्क साधण्यात आला. 304 (47.9%) पौगंडावस्थेतील आणि 124 (42.6%) प्रौढांमध्ये अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या अभ्यासात असेही आढळून आले की 4.6% महिला सहभागींना मासिक पाळीच्या समस्या होत्या. 2.7% सहभागींमध्ये डोळ्यांच्या समस्या दिसल्या आणि 0.6% मध्ये थायरॉईडची कमतरता आढळली. याशिवाय अभ्यासातील लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागला आहे.
संशोधनामध्ये आढळून आलेल्या गोष्टी
किशोरवयीन मुलांमध्ये:
– त्वचेशी संबंधित समस्या (10.5%)
– सामान्य शारीरिक समस्या (10.2%)
– मज्जासंस्थेचा विकार (4.7%)
प्रौढांमध्ये:
– सामान्य शारीरिक समस्या (8.9%)
– स्नायू आणि हाडांचे विकार (5.8%)
– मज्जासंस्थेचे विकार (5.5%)
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने AstraZeneca सारखेच सूत्र वापरून भारतात Covishield लस तयार केली. Covaxin आणि Covishield या भारतात कोरोनाच्या काळात दिल्या जाणाऱ्या दोन मुख्य लसी होत्या.