घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अखेर भावेश भिंडेला अटक झाली आहे. ‘इगो मिडीया प्रायव्हेट लिमिटेडचा मालक असलेल्या भावेश भिंडेला मुंबई क्राइम ब्रँचने उदयपूरमधून ताब्यात घेतले असून त्याला आता मुंबईत आणण्यात आले आहे. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट 7 च्या कार्यालयात नेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी संध्याकाळी घाटकोपर भागात हे महाकाय होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 75 लोक जखमी झाले होते. याप्रकरणी भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भावेश भिंडे हा होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा मालक आहे. ही दुर्घटना घडली त्या दिवसापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. सतत लोकेशन बदलणाऱ्या भावेश भिंडेच्या अखेर मुंबई गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत .राजस्थानमधील उदयपूर येथील एका रिसोर्टमध्ये त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, या घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अनधिकृत पद्धतीने होर्डिंग लावले जाण्याची गंभीर समस्या या प्रसंगातून पुढे आली आहे. याबाबत वेळीच कठोर पद्धतीने नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अशातच पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी भागात काल लोखंडी होल्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र चार दुचाकी आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. हे होल्डींग रस्त्यावर कोसळले नाही नाहीतर तर मोठी दुर्घटना घडली असती.