SRH Vs GT : काल (16 मे) सनरायर्झ हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट पडले. आयपीएल 2024 मधील 66 वा लीग सामना पॅट सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार होता, मात्र हैदराबादमधील खराब हवामानामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला आहे.
हैदराबाद संघ आता या मोसमातील प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाला आहे. तर गुजरात टायटन्स संघाने 14 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 7 पराभवांसह हंगामाचा शेवट केला आहे. या मोसमात आतापर्यंत तीन संघांनी प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
काल हैदराबादमध्ये सनरायझर्स आणि गुजरातचा सामना होणार होता. मात्र, नाणेफेकीपूर्वीच पाऊस सुरू झाल्याने नाणेफेक होऊ शकली नाही. साडेसातच्या सुमारास पाऊस थोडावेळ थांबल्याने सामना अर्धा तास उशिराने सुरू होईल असे वाटत होते. तसेच नाणेफेकीची वेळ 8 वाजता आणि सामना 8.15 वाजता सुरू होण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती, परंतु 8 वाजून पाच मिनिटे आधी पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आणि पुन्हा थांबलाच नाही. अशा स्थितीत पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांशी बोलून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पावसाने व्यत्यय आणलेला या मोसमातील हा तिसरा सामना असून यापूर्वी कोलकाता आणि मुंबई यांच्यातील सामन्यावरही पावसाचा परिणाम झाला होता. हा सामना दोन तास 15 मिनिटे उशिराने सुरू झाला आणि तो 16-16 षटकांचा होता. त्याचवेळी गुजरातचा कोलकातासोबतचा मागील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता.