PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून पत्रकार परिषद न घेतल्यामुळे विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. तर आता यावर स्वत: पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं आहे. “मीडियाचे स्वरूप बदलले आहे आणि ते आता पूर्वीसारखे तटस्थ राहिलेले नाही”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज तकला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आता जनतेला मीडियाच्या विश्वासाचीही जाणीव झाली आहे. पूर्वी प्रसारमाध्यमे चेहराविरहित असायची. मीडियात कोण काय लिहितंय, त्याची विचारधारा काय आहे, याची काळजी पूर्वी कुणालाच नव्हती. आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाहीये. पत्रकार त्यांच्या कल्पना आणि विचारसरणीचा प्रचार करत असतात.”
“मी संसदेला उत्तरदायी आहे. पत्रकारांना आज त्यांच्याच प्राधान्यक्रमावरून ओळखले जाते. तसेच प्रसारमाध्यमे आता पक्षविरहित अस्तित्व राहिलेली नाहीत”, असे पंतप्रधान म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “सध्या राजकारणामध्ये नवीन संस्कृती विकसित झाली आहे. कार्यक्षमतेची चिंता करण्यापेक्षा आजकाल ते माध्यमांचे व्यवस्थापन करण्यावर भर देतात. पण त्या मार्गावर जाण्यावर माझा विश्वास नाही. मला कष्ट करून प्रत्येक गरिबांच्या घरापर्यंत पोहोचायचे आहे. विज्ञान भवनात रिबन कापताना मी फोटोही काढू शकतो. मात्र, मी एका छोट्या प्रकल्पासाठी झारखंडच्या एका छोट्या जिल्ह्यात जातो. मी एक नवीन कार्यसंस्कृती आणली आहे आणि त्यामुळे आता मीडियाने ठरवायचे आहे की ते त्याला समर्थन देतात की नाही ते”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.