PM Modi : काल (16 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “4 जूननंतर इंडिया आघाडीची युती तुटणार आहे. पराभवानंतर बळीचा बकरा ‘खटाखट खटाखट’ सापडेल. तसेच राजपुत्र लखनौचे असोत वा दिल्लीचे, हे राजपुत्र उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘खटाखट खटाखट’ परदेशात जाणार आहेत”, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदींनी केली.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काँग्रेसला मागासवर्गीयांचे आरक्षण संपवायचे आहे. या कामाला कर्नाटकातून सुरुवात झाली आहे. या लोकांना मागासवर्गीयांसाठी आरक्षण घ्यायचे आहे आणि ते मुस्लिमांना द्यायचे आहे. सर्वांची चौकशी करू, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. काँग्रेसला कर्नाटकचा हा फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करायचा आहे.”
“देशाच्या विकासाची काँग्रेस चेष्टा करत आहे. तसेच देशाचा आपोआप विकास होईल, असा सपा आणि काँग्रेसचा विश्वास आहे. आम्ही शौचालये बांधली, तेव्हा त्याचे काय होणार असा सवाल सपा आणि काँग्रेसने केला होता. वर्षानुवर्षे राजवट असूनही देशातील 85 टक्के घरांमध्ये नळाला पाणी नव्हते. पण आम्ही 14 कोटी गरीब लोकांना पिण्याचे पाणी दिले आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “काँग्रेस आणि सपाचे तुष्टीकरणाचे राजकारण इथेच थांबलेले नाही. हे लोक मोदींच्या विरोधात व्होट जिहादचे आवाहन करत आहेत. सत्तेत आल्यास पुन्हा रामलल्लांना तंबूत पाठवून राम मंदिराला कुलूप लावू, असे काँग्रेसचे राजे सांगतात, पण मोदी हे होऊ देणार नाहीत”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.