भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दिल्ली युनिटने शुक्रवारी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) विरोधात 40 पानी आरोपपत्र जारी केले आहे. भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्याचे प्रकाशन करण्यात आले. काँग्रेस आणि ‘आप’ला लुटीतील भागीदार म्हणून नाव देऊन जारी केलेल्या आरोपपत्रात भाजपने ‘आप’चे अपयश समोर आणले आहे. यामध्ये दारू घोटाळा, शीशमहलमध्ये सरकारी पैशांचा अपव्यय, कोरोनाच्या काळात गैरव्यवस्थापन, दिल्लीतील अपयशी शैक्षणिक मॉडेल असे अनेक घोटाळे नमूद करण्यात आले आहेत.
या आरोपपत्र समितीचे अध्यक्ष आमदार विजेंद्र गुप्ता आहेत. कपिल मिश्रा, हरीश खुराना, प्रवीण शंकर कपूर, सरदार राजा इक्बाल सिंग, जय भगवान यादव, गुलशन विरमानी आणि प्रती अग्रवाल हे समिती सदस्य आहेत. यावेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सचिव बिभव कुमारला पंजाबमध्ये लपवू शकतात.
“जर तुमच्यात नैतिकतेचा अंशही शिल्लक असेल तर त्यांनी स्वतः पुढे यावे आणि बिभव कुमारला पोलिसांच्या स्वाधीन करावे”, असे आव्हान सचदेवा यांनी केजरीवाल यांना दिले आहे. ते म्हणाले की, केजरीवालांची अडचण ही आहे की बिभव कुमार हा त्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडींचा साक्षीदार आहे त्यामुळे बिभवला वाचवणे ही त्यांची मजबुरी आहे.