लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. येत्या २० मे रोजी राज्यातील अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर ४८ जागांवरील मतदान पूर्ण होणार आहे. अखेरच्या टप्प्यात नाशिक,ठाणे , कल्याण , मुंबईतील ६ जागा आणि पालघर या ठिकाणी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘tv ९ मराठी’ या मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यामध्ये फडणवीस काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबईतील निवडणूक उद्धव ठाकरे शो आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ”हा शो कोणाचा आहे हे नक्की ४ जूनला कळेल. उद्धव ठाकरेंनी प्रचारामध्ये जी पातळी गाठली आहे, त्यावरून मला प्रश्न पडला आहे की, ते दिल्लीची निवडणूक लढवत आहे की, गल्लीची निवडणूक लढवत आहेत. ज्या प्रकारे ते पांचट टोमणे आणि जोक करतात, हे एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला शोभणारे नाही.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे. त्यांनी कितीही वैयक्तिक टीका केली तरी राज्याच्या जनतेला माहिती आहे की ते कोण आहेत आणि मी कोण आहे ते. मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केल्यास त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. देशात मला राज्यातील प्रमुख नेता म्हणून ओळखतात. मी माझा स्तर ठेवला आहे आणि तो मी ठेवणारच.”