कुटुंबाचे प्रकार जरी काळानुरूप बदलत चालले असले तरी कुटुंबधारणेचा पाया मात्र सनातन आहे. संघटन, संरक्षण, संवर्धन या तीन प्रेरणा कायम असून आजचे कुटुंबही या प्रेरणांवरच उभे आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका श्रीमती मंगला गोडबोले यांनी केले.
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त ‘दृष्टि’ स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘कुटुंब संस्था: समाज व्यवस्थेचा अनमोल पाया’ या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मंगलाताई गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.
‘आजची कुटुंब संस्था कशी आहे व कशी असावी? ’ या विषयावर बोलताना मंगलाताई गोडबोले पुढे म्हणाल्या की, ‘कुटुंब’ ही कल्पना माणसांच्या नसानसात भिनलेली आहे. आपले ‘हक्काचे’ कोणीतरी असावे ही पण माणसाची गरज आहे आणि कोणत्या तरी समूहात राहावे ही पण माणसाची गरज आहे. कोणत्याही कुटुंब प्रकारात राहायचे तर काही सामाईक अटी पाळणे आवश्यक असते. आपले कुटुंब आनंदी करायचे तर सर्वांनीच कौटुंबिक नातेसंबंधात लवचिकता आणणे गरजेचे आहे. तरच सर्व पिढ्यां एकत्र येऊन अधिकाधिक निर्दोष कुटुंबात आनंदाने राहू शकतील असेही त्या म्हणाल्या.
यावेळी भांडारकर संस्थेचे रजिस्ट्रार डॉ. श्रीनंद बापट यांनी कुटुंबसंस्था व विवाहसंस्थेचा इतिहास हा विषय मांडला. छांदोग्य उपनिषदांमध्ये ‘कुटुंब’ हा शब्द आढळतो. हा शब्द घर आणि घरातली माणसे अशा दोन्ही अर्थांनी वापरला जातो. कुटुंबाची नेमकी सुरुवात कुठे, कशी झाली हे सांगणे कठीण आहे असे सांगत त्यांनी रामायण, महाभारतकालीन कुटुंब व्यवस्था कशी होती, तसेच मातृसत्ताक आणि पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था कशी होती याविषयी माहिती दिली.
‘दृष्टि’च्या सचिव डॉ. अंजली देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. गेली 25 वर्षे ‘दृष्टि’चे काम चालू आहे. महिला विषयक वृत्त संग्रहण, संकलन, प्रकाशन, सर्वेक्षण या माध्यमातून ‘दृष्टि’ संस्था काम करते असे सांगून त्यांनी दृष्टीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.दृष्टीने आतापर्यंत महिला शिक्षण, कामकाजी महिला, महिलांची तस्करी, महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग, आर्थिक निर्णयांमधील सहभाग, महिला आणि कृषी, सुरक्षा, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान अशा विविध विषयांवर गेली 15 वर्षे विशेषांक प्रकाशित केले आहेत.
‘कुटुंब संस्था: समाजाचा अनमोल पाया’ या अंकात शहरी, ग्रामीण, वनवासी, भटके विमुक्त, शहरी झोपडपट्टीतील कुटुंब व्यवस्था कशी आहे? कुटुंब व्यवस्थेचा उगम व विकास, कुटुंब आणि शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, आर्थिक विकास, कुटुंबातील स्त्रीचे स्थान, विवाह संस्थेचा विकास, विवाह व कुटुंबसंस्थेची सद्यस्थिती अशा कुटुंब आणि विवाह संस्थेच्या विविध पैलुसंबंधीचे लेख समाविष्ट केलेले आहेत. विशेषांक ‘दृष्टि’ संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
‘दृष्टि’ च्या कोषाध्यक्ष डॉ. पुष्पा रानडे यांनी स्वागत केले. शीतल बसाकरे यांनी आभार मानले.
‘दृष्टि’ कार्यालयाचा पत्ता –
१३६०, भारत भावन, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड,
सरस्वती मंदिर प्रशालेच्या मागे, पुणे- ४११००२
दूरध्वनी – ८६६८२१०१७४
email : drishti.pune@gmail.com, www.streeadhyayan.org
सौजन्य-विश्व संवाद केंद्र,पुणे