Amit Shah : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आत्तापर्यंत देशात लोकसभा निवडणुकांच्या 4 टप्प्यांसाठी मतदान झाले आहे. तर आता लवकरच पाचव्या टप्प्यासाठीचे मतदान पार पडणार आहे. अशातच 4 जूनला भाजपचा पराभव निश्चित आहे, असा दावा विरोध पक्ष वारंवार करत आहे. तर विरोधकांच्या या दाव्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. सोबतच यावेळी त्यांनी बहुमताचा आकडा गाठला नाहीतर भाजपचा प्लॅन बी आहे का? या प्रश्वावरही उत्तर दिलं.
जर लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर भाजपचा प्लॅन बी तयार आहे का? असा प्रश्न अमित शाह यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “अशी कोणतीही शक्यता मला दिसत नाही. कारण पंतप्रधान मोदींच्या पाठीशी 60 कोटी लाभार्थ्यांची मजबूत फौज उभी आहे. “
“ज्यांना कोणतीही जात किंवा वयोगट नाही. सरकारी योजनांचा ज्यांना फायदा झाला आहे त्यांना माहिती आहे की पंतप्रधान मोदी काय आहेत ते आणि त्यांना 400 जागा का द्याव्यात. तसेच प्लॅन बी हा तेव्हाच बनवला जातो तेव्हा प्लान ए च्या याशाची शक्यता 60 टक्क्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे मला विश्वास आहे की पंतप्रधान मोदी हे पुन्हा मोठ्या विजयासह सत्तेत परततील”, असं अमित शाह म्हणाले.
पुढे विरोधी पक्षांवर निशाणा साधत अमित शाह म्हणाले, “इंडिया आघाडीमधील सर्व पात्रं ही सारखीच आहेत त्यामुळे ते एकत्र आले आहेत. या आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाहीच्या राजकारणावर आधारित आहेत. तसेच हे सर्व भ्रष्टाचारात बुडालेले आहेत”, अशी टीका अमित शाह यांनी केली.