भारतातील प्रसिद्ध मसाला ब्रँड एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाला उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड या कीटकनाशकाचे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्याने हाँगकाँग, सिंगापूर आणि मालदीवमध्ये या मसाल्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अशातच आता आणखी एका देशाने या मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. आता नेपाळने या दोन्ही कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातली आहे.
एमडीएच आणि एव्हरेस्ट हे भारतातले जुने मसाल्यांचे ब्रँड असून देशात आणि जगात आपल्या चव आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता त्यात हानिकारक कीटकनाशकांचे प्रमाण आढळून आल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
याची पुष्टी करताना, नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय मसाल्यांच्या ब्रँडच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोन ब्रँडच्या मसाल्यांमध्ये रासायनिक इथिलीन ऑक्साईडची पातळी तपासली जात आहे. अंतिम अहवाल येईपर्यंत बंदी कायम राहणार आहे.
कीटकनाशक इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला MDH आणि एव्हरेस्ट कंपन्यांच्या काही उत्पादनांवर सिंगापूर, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली होती. या उत्पादनांमध्ये कीटकनाशकाचे प्रमाण जास्त असल्याने कर्करोगाचा धोका असल्याचे समोर आले होते.
एमडीएच ग्रुपच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर या तीन मसाल्यांच्या मिश्रणात इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जात आहे. तर एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यातही हे कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड आढळल्याचे म्हंटले जात आहे.
काय आहे हे इथिलीन ऑक्साईड ?
एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमध्ये आढळलेला इथिलीन ऑक्साईड हा एक रंगहीन वायू आहे. सर्वसामान्य तापमानात असताना त्यातून गोड सुवास येतो. NCI अर्थात नॅशनल कॅन्स इन्स्टीट्यूटच्या माहितीनुसार या वायूचा वापर एथिलीन ग्लाइकोल (अँटी फ्रीज) सारख्या रसायनांच्या निर्मितीसाठी केला जातो. त्याशिवाय या घटकाचा वापर कापड, साबण, फोन, औषधं आणि तत्सम पदार्थांच्या निर्मितीसाठी केला जातो. अन्नपदार्थांमध्ये होणारा त्याचा वापर कमी असला तरीही त्याची गणती ‘ग्रुप-1 कार्सिनोजेन’ अर्थात कॅन्सरसाठी कारणीभूत ठरु शकणाऱ्या घटकांमध्ये केली जाते. याच कारणामुळे तातडीने अनेक देश सावधगिरीची पावले उचलताना दिसत आहेत.