Rakhi Sawant Health Update : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण मागील दोन दिवसांपासून ती प्रकृती खराब असल्यामुळे रूग्णालयात आहे. तिच्या छातीत वेदना होत असल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर राखी रूग्णलयात असल्यापासून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. मात्र, दुसरीकडे राखी ड्रामा करत असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. अशातच आता राखीने स्वत: तिच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
यावेळी राखी सावंत म्हणाली की, सध्या माझी प्रकृती ठीक नाही पण मी लवकरच बरी होईल. माझ्या गर्भाशयात डॉक्टरांना 10 सेमीचा ट्युमर आढळला आहे. त्यामुळे आता माझ्यावर शनिवारी शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच मी जास्त बोलू शकत नाही त्यामुळे रितेश माझ्या प्रकृतीबाबत माहिती देत राहतील.
तसेच मी एक अॅक्टर आहे, डॉक्टर नाही. त्यामुळे मी माझ्या आजारपणाबद्दल आत्ताच जास्त काही सांगू शकत नाही, असंही राखीने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, आयुष्यात मी कधीही हार मानलेली नाहीये. लहानपणापासून मी अनेक संकटांवर मात केली आहे. अनेकदा संघर्षही केला आहे. तसेच माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे त्यामुळे ती नेहमी माझ्यासोबत आहे. ही छोटीशी गाठ लवकरच निघेल आणि मी एक फायटर असून लवकरच परतेल, असंही राखी म्हणाली.