येस बँक आणि डीएचएफएल माध्यमातून मोठा आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले हे सीबीआयच्या अटकेत होते. दरम्यान अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर अविनाश भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखांच्या जामिनावर अविनाश भोसले यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई हाय कोर्टाने दिले आहेत. अविनाश भोसले यांना २०२२ मध्ये सीबीआयने अटक केली होती.
येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती जप्त केली होती. अखेर २ वर्षानंतर अविनाश भोसले यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. २०२२ पासून अविनाश भोसले हे तुरुगांतच होते. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर अविनाश भोसले यांनी हायकोर्टात जामीन याचिका दाखल केली होती.