अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी 13 मे रोजी झालेल्या मारहाणी प्रकरणी आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी आज दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला आहे. त्याचदरम्यान मारहाणीवेळचा स्वाती मालिवाल यांचा एक कथित व्हिडीओ समोर आला आहे. तसेच या व्हिडीओबाबत स्वाती मालिवाल यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
या कथित व्हीडिओमध्ये स्वाती मालिवाल या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बसल्या असून तिथले सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. याच दरम्यान त्या अरविंद केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांच्यावर रागावताना दिसत आहेत. “आज मी लोकांना सांगणार आहे. काय करायचे ते करा. तुझी नोकरी खाऊन टाकेन. माझं पोलीस उपायुक्तांसोबत बोलणं करुन द्या. मी आधी सिव्हील लाईन्स पोलिसांसोबत बोलणार आहे.जे होईल ते इथेच होईल. तू मला हात लावलास तर नोकरी गमवावी लागेल. ,”असे स्वाती मालिवाल बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामध्ये स्वाती मालीवाल आरडाओरडा करतानाही दिसत आहेत. सर्वांना धडा शिकवीन, तुमची नोकरीही जाईल, असं त्या म्हणत आहेत.तसेच स्वाति मालीवाल विभव कुमार यांना उद्देशून अपशब्दही उच्चारल्याचेही व्हिडीओत दिसत आहे.
त्यावेळी तिथले सुरक्षा कर्मचारी स्वाती मालिवाल यांना विनंती करताना दिसत आहेत. यावल बोलताना स्वाती मालिवाल या ‘मी आत्ताच 112 वर फोन केला आहे, पोलिस येऊ द्या, मग बोलू,असे म्हणतात. यावर कर्मचारी बाहेर पोलीस येतील, इथे येणार नाहीत, असे म्हणतात. त्यावर बोलताना आता जे होईल ते आतमध्येच होईल, पोलीस आत येतील,असे मालिवाल म्हणाल्या आहेत. .
हा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना स्वाती मालिवाल म्हणाल्या की, नेहमीप्रमाणे यावेळीही राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या लोकांकडून ट्विट करवून घेत, कुठलाही संदर्भ नसलेला अर्धा व्हिडीओ शेअर करून या गुन्हापासून स्वत:ला वाचवता येईल, असे त्यांना वाटत आहे. मात्र कुणी मारहाण होत असताना व्हिडीओ तयार करू शकतं का ? त्या घराच्या आतील आणि खोलीमधील सीसीटीव्हीची तपासणी होईल, तेव्हा सत्य सर्वांच्या समोर येईल. ज्या पातळीपर्यंत घसरायचं तेवढं घसरा, देव सगळे काही बघतोय. एक ना एक दिवस सत्य जगासमोर येईल, असे स्वाती मालीवाल विभव कुमार आणि त्यांचे समर्थन करण्याऱ्या लोकांना उद्देशून म्हटल्या आहेत.