लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ५ व्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. राज्यातील १३ जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान मुंबईतील ६ जागांवर आणि ठाणे, कल्याण व पालघर या जागांवरील उमेदवारांसाठी आज मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज सभेसाठी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच मंचावर एकत्रित आले होते. मनसेने महायुतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही राज्याला पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर घेऊन आलो आहोत. तीन राज्यांचा विचार केल्यास त्यांची एकत्रित मिळून राज्याची गुंतवणूक आहे. मुंबईवर अनेक हल्ले झाले.अनेक वीरांनी मुंबईच्या रक्षणाकरिता आपला जीव दिला. आम्ही उज्वल निकम यांना तिकीट दिल्यानंतर हे नालायक काँग्रेसवाले म्हणतात, उज्वल निकमानी कसाबचा अपमान केला. म्हणतात कसाबने करकरे यांना मारलेच नाही. अरे नालायकांनो मतांकरिता या देशाच्या आणि मुंबईच्या शहिदांचा अपमान करू नका. इंडिया आघाडी अजमल कसबसोबत आहे आणि आम्ही उज्वल निकम यांच्यासोबत आहोत.”
आजच्या शिवाजी पार्कवरील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्रीमंडळातील सहकारी , महायुतीचे नेते उपस्थित होते. तसेच मुंबईतील ६ उमेदवार, पालघर, ठाणे , कळ्यांचे उमेदवार देखील उपस्थित होते. एनडीए प्रणित भाजपा सरकारने अब की बार ४०० आणि फार एक बार मोदी सरकार अशा घोषणा दिल्या आहेत.