लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजप नेते नरेंद्र मोदी आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. तर गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज झारखंडमध्ये एक आणि पश्चिम बंगालमध्ये तीन जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. जमशेदपूर, झारखंड येथे सकाळी 11 वाजता निवडणूक रॅलीनंतर ते पश्चिम बंगालला रवाना होतील. पंतप्रधान मोदी आज दुपारी १२.४५ वाजता पुरुलिया, पश्चिम बंगालमध्ये आणि दुपारी २.३० वाजता पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर येथे निवडणूक रॅलींना संबोधित करतील. दिवसाचा शेवटचा निवडणूक कार्यक्रम म्हणून पंतप्रधान मेदिनीपूरला भेट देतील आणि दुपारी ४.१५ वाजता निवडणूक रॅलीला संबोधित करतील. झारखंड आणि पश्चिम बंगालचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी ७ वाजता भुवनेश्वरला पोहोचतील. भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकीनंतर मोदी उद्या म्हणजे सोमवारी भगवान जगन्नाथ मंदिरात ‘दर्शन-पूजा’ करणार आहेत. यानंतर ते पुरीत सकाळी ८ वाजता आयोजित रोड शोमध्ये सहभागी होतील.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह आज उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. दुपारी 12 वाजता प्रयागराजच्या सोरावन आणि जौनपूरच्या मडियाहुन येथे निवडणूक रॅलींना संबोधित केल्यानंतर ते बिहारला रवाना होतील. बिहारमधील बेतिया येथील बडा रमना मैदानावर दुपारी चार वाजता निवडणूक रॅलीला संबोधित करतील.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज हरियाणात प्रचार करणार आहेत. कैथल जिल्ह्यातील कुरुक्षेत्र येथे सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.