महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांची सांगता उद्या 20 मे रोजी होत असून मुंबई सह मुंबई उपनगरातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. तसेच प्रचारसभांचाही शेवट झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभा मुंबईसह महाराष्ट्रात पार पडल्या आहेत. या सभांसाठीही पोलिसांनी दिवस-रात्र मेहनत घेत चोख बंदोबस्त निभावून दाखवला आहे . आता, शेवटच्या 20 मे रोजीच्या मतदानासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मुंबई पोलीस (Police) दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) तैनात करण्यात आलेले आहेत. राजधानी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून पोलिसांची आगाऊ कुमक मागविण्यात आली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात पोलीस, राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये १५ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.या तिन्ही मतदानसंघासाठी बाहेरील जिल्ह्यांमधून अतिरिक्त तीन पोलिस उपायुक्त नऊ सहायक पोलिस आयुक्त आणि १९ निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ८० प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील ६९० अंमलदार, तीन हजार ४९१ होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा बोलवण्यात आला आहे.
तर, उल्हासनगर परिमंडळामध्ये सिुंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या चार एसआरपीएफ तसेच बीएसएफच्या कंपन्या राहणार राहणार आहेत. तर, वागळे इस्टेट परिमंडळ पाचमध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, बीएसएफ आणि राज्य राखीव दल अशा तीन कंपन्या नेमण्यात आल्या आहेत.
याशिवाय, ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक, तर भिवंडीमध्ये दोन अशा सहा एसआरपीएफच्या प्लाटून असणार आहेत. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांच्याही चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांची भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा संपूर्ण फौजफाटा मतदान केंद्र आणि इव्हीएम मशिन असलेल्या स्ट्रॉगरूमच्या ठिकाणी राहणार आहे.यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची चोख काळजी घेतली जाणार आहे.