Terrorist Attack In Jammu Kashmir : नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये 2 दहशतवादी हल्ले झाल्याची बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अनंतनाग आणि शोपियानमध्ये हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनंतनाग येथे फिरायला आलेले पती-पत्नी गोळ्या लागल्यामुळे जखमी झाले आहेत.
काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अनंतनागच्या पहलगाममधील पर्यटकांच्या कॅम्पवर हल्ला केला आहे. तर राजस्थानमधील जयपूर येथून जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी आलेले तबरेज आणि फराह येथेच थांबले होते आणि त्यांना दहशतवाद्यांच्या गोळ्या लागल्यामुळे ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर सध्या या दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
दुसरीकडे शोपियानमध्ये भाजप नेत्याची हत्या करण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या काळातील हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी अनंतनागमध्ये 17 एप्रिल रोजी ढाबा चालवणाऱ्या बिहारमधील 35 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. तर 8 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील एका पर्यटक मार्गदर्शकाची हत्या करण्यात आली होती.
दुसरा दहशतवादी हल्ला शोपियांच्या हीरपोरा भागात झाला, जिथे भाजप नेते आणि माजी सरपंच एजाज अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच लष्कराच्या जवानांनी ताबा घेत शोध मोहीम हाती घेतली आहे.