PM Modi On Rahul Gandhi : पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी आज (19 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये प्रचार केला. जमशेदपूरमधील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यादरम्यान पीएम मोदींनी राज्यातील सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)वर हल्लाबोल केला. झामुमोवर त्यांनी खोटे बोलल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांनी प्रत्येक संधीवर झारखंडला लुटले आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. राहुल गांधींच्या रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरही पंतप्रधान मोदींनी खरपूस समाचार घेतला.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेएमएम आणि काँग्रेसच्या लोकांना विकासाचे अ, ब, क, ड देखील माहित नाही. खोटे बोलणे, मोठ्याने बोलणे ही त्यांची पद्धत आहे. ते SC-ST-OBC चे आरक्षण हिरावून घेतील आणि झामुमोसारख्या पक्षांनी आमच्या झारखंडला प्रत्येक संधीवर लुटले आहे. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे.”
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस देशाच्या उद्योजकांना आपले शत्रू मानत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “आम्हाला जे व्यापारी पैसे देत नाहीत, त्यांच्यावर आम्ही हल्ला करतो, असे काँग्रेसचे नेते उघडपणे सांगतात. याचा अर्थ काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांना देशातील उद्योगांची चिंता नाही”, अशी टीका मोदींनी केली.
लोकसभा निवडणुकीत वायनाडशिवाय राहुल गांधी रायबरेलीमधूनही निवडणूक लढवत आहेत. राहुल यांच्या रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा पंतप्रधान मोदींनी समाचार घेतला. ते म्हणाले, “काँग्रेसचा राजकुमार वायनाडमधून पळून रायबरेलीला निवडणूक लढवायला गेला आहे आणि सर्वांना सांगत आहे की ही माझ्या आईची जागा आहे. आठ वर्षांचे मूल शाळेत गेल्यावर वडिलांची शाळा आहे असे सांगत नाही, वडिलांनी तिथे शिक्षण घेतले असले तरी. हे कुटुंबावर आधारित लोक संसदीय जागांचे इच्छापत्र लिहित आहेत. अशा घराणेशाही पक्षांपासून झारखंडला वाचवायला हवे”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.