भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत भाजपने ‘आप’ला चिरडण्यासाठी ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले आहे आणि भाजपने सर्वांना अटक करण्याची योजना आखली आहे. असा आरोप नुकतेच अंतरिम जामिनावर बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
आज भाजप मुख्यालयाकडे नियोजित निषेध मोर्चाच्या आधी राष्ट्रीय राजधानीतील डीडीयू मार्गावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले होते. या रॅलीमध्ये आपचे सर्व नेते सामील झाले होते.
“आम्ही मोठे होऊ नये आणि त्यांच्यासाठी आव्हान बनू नये म्हणून भाजपने ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन झाडू’च्या माध्यमातून ‘आप’च्या बड्या नेत्यांना अटक केली जाईल; त्यांना अटक केली जात आहे, आणि येत्या काही दिवसांत ‘आप’च्या बँक खाती गोठवली जातील ” असे केजरीवाल म्हणाले आहेत. .
केजरीवाल यांचे सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार विधान त्यांचे माजी पीए, आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याच्या प्रकरणी बिभव कुमार यांच्या अटकेच्या एका दिवसानंतर आले आहे.
आपल्या भाषणादरम्यान केजरीवाल पुढे म्हणाले की भाजप 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका संपल्यानंतर आपच्या नेत्यांची बँक खाती गोठवण्याचा कट रचत आहे.
“भाजपने खोटे गुन्हे दाखल करून आप नेत्यांना अटक केली आहे. “मी 2015 मध्ये सत्तेत आल्यापासून, त्यांनी (भाजप) किती आरोप केले? आता ते म्हणतात की दारू धोरण घोटाळा झाला आहे, लोक त्यांना विचारत आहेत की घोटाळा झाला का आणि पैसा कुठे आहे. इतर ठिकाणी, केव्हा छापे पडतात, नोटा आणि सोने जप्त केले जाते, परंतु येथे काहीच जप्त करण्यात आलेले नाही”, असे केजरीवाल म्हणाले आहेत.
दरम्यान, नियोजित ‘जेल भरो’ निषेधाचा भाग म्हणून दिल्ली पोलिसांनी आज आपच्या अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रीय राजधानीतील भाजप मुख्यालयाकडे कूच करताना ताब्यात घेतले आहे.