Soni Razdan : बॉलिवूडमध्ये नुकतीच एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांच्यासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतची माहिती स्वत: सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
सोनी राजदान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “सध्या आपल्या आजूबाजूला खूप मोठा घोटाळा सुरू आहे. कारण मला कोणीतरी फोन केला आणि सांगितले की, ते दिल्ली कस्टम्समधून बोलत आहेत. तसेच मी काही बेकायदेशीर ड्रग्स ऑर्डर केल्याचं त्यांनी मला सांगितलं. “
“मला फोन केलेल्या व्यक्तीनं सांगितलं की, तो एक पोलीस आहे आणि मला त्याने माझा आधार कार्ड क्रमांक विचारला. जसा हा कॉल मला आला होता त्याप्रमाणे माझ्या ओळखीच्या इतर लोकांना देखील हा कॉल आला आहे”, असं सोनी राजदान यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या, “अशी लोकं तुम्हाला फोन करून धमक्या देतात, घाबरवतात आणि तुमच्याकडून मोठी रक्कम घेण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही त्या लोकांच्या बोलण्यात अडकू नका. मी त्या लोकांना माझा आधार कार्ड नंबर सांगितला नाही आणि फोन ठेवला. नंतर मला त्या लोकांचा पुन्हा फोन आला नाही.”
https://www.instagram.com/p/C7Gow2XIOl_/?utm_source=ig_web_copy_link
तसेच सोनी राजदान यांनी ही पोस्ट शेअऱ करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “तुम्हाला अशा स्वरूपाचा फोन येतो तेव्हा तो खरा कॉल आहे असं वाटतं, त्यामुळे तुम्ही गोंधळू शकता. मला देखील हा कॉल जवळजवळ खरा वाटलेला. पण जेव्हा याबाबत मी कोणाशी बोलले तेव्हा मला त्यांनी सांगितलं की हा एक घोटाळा आहे. त्यामुळे सावधान, कारण हा एक घोटाळा आहे”, असं सोनी राजदान यांनी लिहिलं असून या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग देखील केलं आहे.