Raghunandan Srinivas Kamath Passed Away : आईस्क्रीम मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले आणि नॅचरल आइस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. तर रघुनंदन कामथ यांच्या निधनाची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून देण्यात आली आहे.
रघुनंदन कामथ यांच्या निधनाची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करण्यात आली आहे. कंपनीने लिहिले आहे की, “नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामथ यांचे निधन झाले आहे. आमच्यासाठी हा खूप दुःखाचा आणि दुर्दैवी दिवस आहे.”
रघुनंदन कामथ यांचा जन्म कर्नाटकातील मंगळुरू येथील एका गावात झाला. ते 6 भावंडांपैकी एक होते. तर मुंबईत येऊन भावाच्या रेस्टॉरंटमध्ये काम करू लागल्यानंतर काही दिवसांनी ते वेगळे झाले. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करूनही हार मानली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते.
14 फेब्रुवारी 1984 रोजी रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी फक्त चार कर्मचारी आणि 10 आइस्क्रीम फ्लेवर्ससह नॅचरल आईस्क्रीमची स्थापना केली होती. त्यांनी फक्त फळे, दूध आणि साखर वापरून आईस्क्रीम बनवले. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कामथ यांनी मुख्य पदार्थ म्हणून पावभाजी आणि साइड आयटम म्हणून आइस्क्रीम विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 12 फ्लेवर्स स्टोअरमध्ये उपलब्ध होते. त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे ते लवकरच एक प्रसिद्ध आइस्क्रीम पार्लर बनले. त्यानंतर रघुनंदन श्रीनिवास कामथ यांना भारतातील आईस्क्रीम मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले होते.