Swati Maliwal Assault Case : दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाणीच्या प्रकरणाने आता जोर पकडला आहे. शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांच्या अटकेविरोधात भाजपवर निशाणा साधला. तर त्यांनी आज (19 मे) भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्याची घोषणाही केली. या दरम्यान, मारहाणीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आज दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरातील सीसीटीव्ही, डीव्हीआर ताब्यात घेतला आहे.
स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही, डीव्हीआर जप्त केला आहे. तर पोलिसांनी काल केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांना अटक केली होती.
मुख्यमंत्री केजरीवालांनी आज जाहीर केलेली निदर्शने आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी भाजप मुख्यालयातील सुरक्षा वाढवली आहे. दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याच्या ‘आप’च्या योजनेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी एक ॲडव्हायझरी जारी केली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरेसा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. आंदोलन करणाऱ्या ‘आप’च्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.