आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश या ठिकाणी मतदान होत आहे. ४९ जागांसाठी आज देशभरात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य मतदारांसह बॉलिवूड आणि मराठी अभिनेते देखील आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच यावेळेस त्यांनी आपले मत देखील व्यक्त केले आहे.
मतदान केल्यानंतर प्रशांत दामले म्हणाले, ”मतदान करण्याचा मला उत्साह असतो. पाच वर्षांमधून एकदा मतदान करायला मिळते. दिवाळी वर्षातून एकदा येते. मात्र मतदानाच हक्क पाच वर्षातून एकदा बजावत येतो. सर्वानी मतदान केले पाहिजे. मी देखील मतदान केले आहे.माझी सर्व तरुणांना विनंती आहे की, ऑफिसला जाण्याआधी मतदान केंद्रात जाऊन मतदान करा. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे , म्हणून आपण मतदानातही नंबर १ लाच राहिले पाहिजे.
आज सकाळी ७ वाजल्यापासून लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या शेवटच्या टप्प्यात देशातील एकूण ६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ४९ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर या टप्प्यात एकूण ६८५ उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.