Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाच्या पाचव्या टप्प्यासाठी आज देशात मतदान सुरू आहे. देशात एकूण 49 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. तर आज महाराष्ट्रातलं शेवटच्या टप्प्यातलं हे मतदान आहे. त्यामुळे मुंबईत सध्या मतदान सुरू आहे.
आज सकाळपासून सर्वसामान्य जनतेसह सेलिब्रिटी आणि अनेक राजकीय नेतेमंडळी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. यामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
शिवाजी पार्क येथील बालमोहन शाळेत राज ठाकरेंनी आपल्या कुटुंबासमवेत मतदान केलं. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. आता तर मतदानाला सुरूवात झाली आहे, त्यामुळे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं. तसेच मुंबईकर जास्तीत बाहेर पडून मतदान करतील ही अपेक्षा आहे.”
पुढे मुंबईकरांना काय आवाहन कराल? असा प्रश्न माध्यमांनी राज ठाकरेंना विचारला. यावर ते म्हणाले, “तेच ते आपलं घीसापीटा वाक्य, मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा. आजचे तरूण-तरूणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील. तसेच ज्यांचं आज पहिलंच मतदान आहे असा तरूण वर्ग मतदानाला आवर्जून येईल. काहींच्या आशा संपल्या आहेत त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षा करू नका”, असंही राज ठाकरे म्हणाले.