बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम आणि तिचा पती बॉलीवूड दिग्दर्शक आदित्य धर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला असल्याची माहिती इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यामीने दिली आहे. तसेच बाळाचे नावही तिने यातून जाहीर केले आहे.
यामीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “१० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आम्हाला मुलगा झाला. आम्ही आमच्या बाळाचं नाव ‘वेदविद’ असं ठेवलं आहे. हे संस्कृतमधले नाव असून वेदविद म्हणजे चांगले वेद, संस्कार जाणणारा असा अर्थ आहे. आम्ही दोघं आता पालकत्वाच्या सुंदर अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत. आमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. माझा मुलगा आपल्या देशासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल अशी आशा मी व्यक्त करते.”
यामी गौतम आणि आदित्य धरचा विवाहसोहळा ४ जून २०२१ रोजी पार पडला होता. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी यामी व आदित्यने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर दोघेही काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आदित्य धर याचे दिग्दर्शन असलेल्या आर्टिकल ३७० मध्ये यामी मुख्य भूमिकेत झळकली होती.
आता लग्नाच्या तीन वर्षांनी यामी आणि आदित्य आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या बाळाचं ‘वेदविद’ हे नाव आता चाहत्यांसमोर आल्यानंतर सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.