PM Narendra Modi : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. या दु:खद घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. ते ट्विट करत म्हणाले की, “इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्या दुःखद निधनाने खूप दु:ख झाले आहे. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे.”
रविवारी (19 मे) रायसी आणि त्यांच्या सोबतच्या शिष्टमंडळाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर पूर्व अझरबैजान प्रांतातील वारझाकान आणि जोल्फा शहरांदरम्यान असलेल्या डिझमार जंगलात कोसळले. हेलिकॉप्टरवर बसलेल्या इतरांमध्ये देशाचे परराष्ट्र मंत्री अमिर अब्दुल्लाहियान, पूर्व अझरबैजानचे गव्हर्नर मलेक रहमाती, ताब्रिझ शहरातील शुक्रवारच्या नमाजाचे नेते सय्यद मोहम्मद अली अल-हाशेम आणि राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचे सदस्य महदी यांचा समावेश होता. या लोकांशिवाय हेलिकॉप्टरचा पायलट, को-पायलट आणि क्रू मेंबर्सही त्यात होते.
रायसी आणि त्यांचे सोबतचे शिष्टमंडळ अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत अरस नदीवरील धरणाच्या उद्घाटन समारंभातून परतत होते. रायसी आणि त्यांच्या टीमच्या मृत्यूच्या घोषणेनंतर, इराणच्या मंत्रिमंडळाने उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांच्या अध्यक्षतेखाली एक आपत्कालीन सत्र आयोजित केले होते. रैसी रविवारी दुपारी ताब्रिझ शहराकडे जात असताना दाट धुक्यात हेलिकॉप्टर अडकले.