मल्हारराव होळकर यांचा जन्म दिनांक 16 मार्च, 1693 रोजी झाला. त्यांचे घराणे मूळचे वाफगावचे. त्यांचे कुलदैवत जेजुरी येथील खंडोबा. तेथून ते केव्हातरी फलटण परगण्यात होळ या गावी आले. मल्हाररावांचे वडील म्हणजे खंडोजी. ते ग्रामधिकारी होते. परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे आई आश्रयाला आपले भाऊ भोजराज बारगळ यांच्याकडे म्हणजे तळोदा (जिल्हा धुळे) येथे आल्या. येथेच त्यांचे प्रारंभीचे आयुष्य गेले.
सन 1717 मध्ये नात्यातीलच वधू गौतमाबाई यांचेशी त्यांचा विवाह झाला. मल्हारराव सन 1720 ते 1740 या काळात पहिले बाजीराव पेशवे यांच्या सेवेत होते. ▪️या दरम्यानच्या अनेक मोहिमांत ते पहिल्या बाजीरावांबरोबर सहभागी झाले आणि त्यांनी सोपवलेली कामगिरी फत्ते केली आणि कित्येक युद्धात विजय मिळवून दिला. मल्हाररावांच्या या पराक्रमामुळे आणि स्वामीभक्तिमुळे पहिल्या बाजीरावांनी मध्य भारतातील एक मोठा मुलुख – म्हणजे माळवा प्रांत – मल्हाररावांकडे शासक म्हणून सोपवला. या सुभ्याचे ते प्रथम शासक होत.
त्यांनी या सुभ्याची घडी बसवून आणि आपल्या कर्तृत्वाने उत्तम शासन करून आर्थिक स्थिती भक्कम केली. वेगवेगळ्या मोहिमा आखून आणि जिंकलेला मुलुख व्यवस्थित ठेऊन सुभा राखला होता. माळवा सुभ्याचे होळकर म्हणजे पेशवाईचा एक मजबूत आधारस्तंभ होते.
दिनांक 20 मे 1766 रोजी या महान शासकाने शेवटचा श्वास घेतला.
_____________________
(संदर्भ-भारतकोश)
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे