आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म, २० मे १८५० पुणे येथील एका विद्वान कुटुंबात झाला. विष्णुशास्त्री हे मराठी निबंधकार लेखक, पत्रकार, देशभक्त होते.
साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण आदी क्षेत्रांत त्यांचा निर्भीड वावर होता, हुकमत होती. कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती. ते त्यांच्या भावंडांची शिकवणी घरी घेत असत. विष्णुशास्त्री यांना त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांचे आजोबा उजळणी, लेखन, वाचन शिकवत असत.
नागनाथ अण्णांच्या वाड्यात भरणाऱ्या शाळेत मोडी, अक्षरलेखन, वाचन तसंच तोंडी हिशेब शिकले होते.
त्यांना ‘पूना हायस्कूल’मध्ये चिमणाजी महादेव, नारायण कृष्ण गोखले आणि वामन आबाजी मोडक यांच्यासारखे चांगले शिक्षक लाभले. ते ‘पूना हायस्कूल’मध्ये कृष्णशास्त्री वैजापूरकर या शास्त्रींकडून संस्कृत विषय उत्तम प्रकारे शिकले. विष्णुशास्त्री यांनी शाळेत असताना ऑलिव्हर गोल्डस्मिथचं ‘द डेझर्टेड व्हिलेज’ हे दीर्घकाव्य बिनचूक पाठ करून चिमणाजी महादेव या शिक्षकांकडून हातरुमाल बक्षीस म्हणून मिळवला होता. त्यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी नारायण भिकाजी गोगटे यांच्या कन्येशी म्हणजे काशीबाई यांच्याशी झाला.
त्यांचे महाविद्यालय शिक्षण पुण्यातील पुना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयातून पदवीचा अभ्यासक पुर्ण केला. प्रसिध्द इंग्रजी कवी विल्यम वर्डसवर्थ यांचे नातू त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवायला होते. वर्डसवर्थ यांच्या शिकवण्याचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यांच्यामुळेच त्यांनी ग्रीक, रोमन आणि इंग्रजी इतिहासकारांचे ग्रंथ वाचून काढले.
तर महाविद्यालयातील शिक्षणकाळात त्यांनी तेथील ग्रंथालयातील बहुतेक सर्व पुस्तके वाचून काढली. त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र तर्कशास्त्र, नितीशास्त्र या विषयांचे तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम गंथाचे सखोल ज्ञान होते.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर विष्णुशास्त्रींनी शिक्षकी पेशा स्विकारला त्यांनी १८७२ ते १८७७ या काळात रत्नागिरी येथील शाळांमधून अध्यापनाचा काम केले.
स्वदेश, स्वभाषा स्वसंस्कृती जागृत करण्याचे काम त्यांनी केले.
बी. ए. होण्यापूर्वीच ते वडिलांच्या ‘शालापत्रक’ या मासिकाचं काम पाहत असत. मात्र त्यातून ब्रिटिश सरकारचं धोरण आणि मिशनरी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे ते मासिक ब्रिटिशांनी १८७५ मध्ये बंद पाडलं.१८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. विविध ८४ विषयांवर लिहीलेल्या त्यांच्या निबंधकांनी मराठी निबंधांना सामर्थ्य दिले. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले.
त्यांनी १८७८ साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. १८७५ साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्याच्या उद्दिष्टातून, १८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल शाळा स्थापली तसेच फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन करण्यात पुढाकार घेतला. १८८१ सालाच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले.
विद्वत्व, कवित्व आणि वक्तृत्व हे तीन गुण चिपळूणकर, टिळक आणि आगरकर या त्रयीसाठी खूप उपयोगाचे ठरले. त्या तिघांनीही एकत्र येत तत्कालीन तरुणांचा दृष्टिकोन तयार करण्याचं जे काम केलं त्याला तोड नाही.
त्यांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणतात. ते ‘आधुनिक गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जातात.असे विविधांगी विद्वत्तेचे तेज असलेले विष्णुशास्त्रीनीं वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
मंजुषा जोशी
सौजन्य -समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत