PM Modi In Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (21 मे) पुन्हा एकदा वाराणसी दौऱ्यावर आहेत. ते वाराणसीतील काशी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 25 हजार महिलांशी संवाद साधणार आहेत. याबाबत भाजपचे काशी प्रदेश प्रवक्ते नवरतन राठी यांनी माहिती दिली की, वाराणसी लोकसभेत 1,909 बूथ आहेत.
पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी प्रत्येक बूथवरून 10 महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे. भाजपच्या राज्य युनिट सचिव आणि महिला मोर्चाच्या प्रभारी अर्चना मिश्रा यांनी सांगितले की, भाजपच्या महिला विंगच्या सदस्य वाराणसीमध्ये घरोघरी जाऊन महिलांना मंगळवारच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहेत. यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
महिला मोर्चाच्या प्रभारी अर्चना मिश्रा म्हणाल्या की, “13 मे रोजी त्यांच्या काशी रोड शोमध्ये आमच्या उत्साही सहभागाने पंतप्रधान मोदींना खूप आनंद झाला आणि त्यामुळेच ते आमच्यासोबत त्यांचा आनंद शेअर करण्यासाठी पुन्हा इथे येत आहेत.” दुपारी चारच्या सुमारास सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, चार्टर्ड अकाउंटंट आणि शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
लोकसभा समन्वयक आणि आमदार अश्विनी त्यागी म्हणाल्या, “पंतप्रधानांनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात महिलांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली आहेत. त्यांच्यामुळेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाले आहे. NARI अंतर्गत आजच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी वाराणसीतील BLW गेस्ट हाऊसमध्ये रात्रभर मुक्काम करणार आहेत.