Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मद्यपान करत वेगाने सुपरकार चालवत दोन जणांना मागून जोरात धडक दिली. या अपघातात एका तरूण आणि तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अग्रवाल यांच्या मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच त्याला काही अटीशर्तींसह जामीन मिळाल . तर आता त्या मुलाचे वडील, व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
विशाल अग्रवाल यांच्या मुलाने नुकतीच एक मोठी कबुली दिली आहे ज्यामुळे अग्रवाल गोत्यात सापडले आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “मी कार चालवण्याचे रितसर प्रशिक्षण घेतले नसून माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवाना देखील नाहीये. तरीही माझ्या वडिलांनी मला त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली होती. तसेच त्यांनी मला मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठीही परवानगी दिली होती. मी मद्यप्राशन करतो हे माझ्या वडिलांना माहिती आहे”, असं आरोपी मुलाने पोलिसांना सांगितलं. या धक्कादायक खुलाशानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी मुलाने दिलेल्या माहितीनंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच विशाल अग्रवाल हे फरार होते, मात्र अखेर पुणे पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येऊन अटक केली आहे.