सध्या देशभरात सायबर क्राईमचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ऑनलाईन फ्रॉड करणे, हॅकिंग करून लुटणे असे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. सायबर पोलीस या प्रकारची गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तसेच आता ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलली आहे. देशभरात १८ लाखांपेक्षा जास्त सिम बंद केली जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या या कारवाईत सर्व टेलिकॉम कंपन्या सरकारला सहकार्य करणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी अशा संशयास्पद सिमची याआधीच तपासणी केलेली आहे. या सिमकार्डच्या मदतीने अनेक प्रकारचे आर्थिक गुन्हे केले जात असल्याचे समोर आहे. गेल्या वर्षी देखील सायबर गुन्ह्यांशी संबंधित २ लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड बंद केले होते. त्यामुळे आता अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.