दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आप राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले होते. केजरीवाल यांचा पीए विभव कुमार यांनी मालिवाल यांच्याशी गैरवर्तन केले होते. दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला अटक केली आहे. सध्या न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षात अंतर्गत कलह सातत्याने वाढत आहे. राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आप मंत्री आतिशी मार्लेना यांनी स्वाती यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. याशिवाय आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्वाती मालीवाल यांच्याबद्दल म्हटले होते की, त्या भाजपच्या इशाऱ्यावर खोटे आरोप करत आहेत. त्यावर आता स्वाती मालीवाल यांनी पलटवार केला आहे.
स्वाती मालीवाल यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या, ”हा एफआयआर ८ वर्षांपूर्वी २०१६ मध्ये दाखल करण्यात आला होता, त्यानंतर सीएम आणि एलजी दोघांनीही मला आणखी दोनदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. हा खटला पूर्णपणे खोटा असून त्यावर माननीय उच्च न्यायालयाने दीड वर्षांसाठी स्थगिती दिली असून, पैशाचा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे मान्य केले आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, ”“मी बिभव कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल करेपर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार मी “लेडी सिंघम” होते आणि आज मी भाजपची एजंट बनले आहे? मी खरे बोलले म्हणून माझ्याविरुद्ध संपूर्ण ट्रोल आर्मी तैनात करण्यात आली. पक्षातील सर्वांना फोन करून सांगितले जात आहे की, तुमच्याकडे स्वातीचा वैयक्तिक व्हिडिओ असेल तर पाठवा, तो लीक करावा लागेल.