Shekhar Suman : प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. कारण शेखर सुमन हे संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमध्ये दिसत आहेत. या सीरिजमध्ये त्यांनी नवाबाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ते सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
या सीरिजशिवाय शेखर सुमन यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांना चकित केले आहे. अशातच आता शेखर यांनी मोठं वक्तव केलं आहे. जर मी पक्षात राहून काम करू शकलो नाही तर भाजप सोडणार आहे, असं वक्तव्य शेखर सुमन यांनी केलं आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत बोलताना अभिनेते शेखर सुमन म्हणाले की, “मी भाजप पक्षात सेवा करण्यासाठी प्रवेश केला आहे. मी स्वत:साठी एक डेडलाईनही ठरवून घेतली आहे. तसेच मी कोणत्याही राजकीय वादात आणि कोणत्याही राजकीय महत्त्वाकांक्षेमध्ये पडू इच्छित नाही”, असेही शेखर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मला अजूनही एक अभिनेता व्हायचे आहे जो राजकारणाचा भाग आहे जेणेकरुन मला माझ्या उद्योगासाठी आणि माझ्या राज्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्यासाठी मला सामर्थ्य मिळेल. मी कोणत्याही राजकीय गोंधळाला घाबरत नाही. तसेच मला राजकारणात राहून ज्या प्रकारची कामे करायची आहेत तेच करायचे आहे. तसेच मी माझ्यासाठी एक अंतिम मुदत ठेवली आहे आणि जर मी माझे वचन पूर्ण करू शकलो नाही तर मी पक्षातून बाहेर पडेन”, असे शेखर म्हणाले.
राजकारणामध्ये येण्याचा उद्देश सांगताना शेखर म्हणाले, “मी राजकारणात एका विशिष्ट कारणासाठी आलो आहे, ते म्हणजे सेवा करण्यासाठी. जर मला सेवा करता येत नसेल, तर तेथे असण्यात काही अर्थ नाही. पण जेव्हा तुम्ही सकारात्मकतेने येता आणि काही करता तेव्हा देवही तुम्हाला मदत करतो”, असेही शेखर सुमन म्हणाले.