CM Eknath Shinde : सोमवारी (20 मे) लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील या शेवटच्या टप्प्यात मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. तर या पाचव्या टप्प्याची एकूण मतदानाची आकडेवारी पाहता आत्तापर्यंतच्या टप्प्यांपेक्षा सर्वात कमी आहे. तसेच खळबळजनक बाब म्हणजे मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये घोळ झाल्याचं दिसून आलं.
मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला. तसेच मतदान प्रक्रियाही अतिशय संथ गतीने राबवण्याती आली होती त्यामुळे मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्याचंही दिसून आलं होतं. या घोळानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आपण न्यायालयात जाणार असल्याचंही ते म्हणाले.
आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन करी यांना उच्चस्तरीय चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईत झालेल्या मतदार यांद्यांमधील घोळ आणि गोंधळाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमूण तपास केला जाऊ शकतो.