इराण साठी मोठी आणि वाईट बातमी समोर आली असून इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा शोध लागला असून त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशाच्या वायव्य भागात एक दिवसापूर्वी अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमधील परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान आणि इतर सर्वांचाही यात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनानंतर इराणने मोठी घोषणा केली आहे. इराणने देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमध्ये २८ जून रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांकडून मिळाली आहे.
इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने सांगितले, “निवडणुकीची तारीख न्यायव्यवस्था, सरकार आणि संसदेच्या प्रमुखांच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. गार्जियन काउंसिलच्या प्राथमिक करारानुसार, १४ व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक २८ जून रोजी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” तोपर्यंत प्रथम उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांची देशाच्या हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी देशात पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतातही मंगळवारी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. या कालावधीत कोणत्याही मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.