Milind Deora On Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर आता मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष का सोडला याबाबतचा खुलासा केला. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केला. उद्धव ठाकरेंमुळेच आपण काँग्रेस पक्ष सोडला, असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी मिलिंद देवरा म्हणाले की, “काँग्रेस पक्ष हा माझ्यासाठी भूतकाळ आहे. आता मला भविष्यात बघायचे आहे. तसेच साऊथ मुंबई मतदारसंघ हा मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट मतदारसंघ आहे. त्यामुळे ज्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा मी काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं होतं की आपण ही जागा गमवायला नको. मात्र, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला पक्षातून बाहेर पडावं लागलं”, असा खुलासा देवरा यांनी केला.
पुढे शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनीताई जाधव या निवडून येतील असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला. “दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनीताई जाधव या फायटर आहेत. त्यामुळे त्या नक्कीच निवडून येतील, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही”, असा विश्वास देवरा यांनी व्यक्त केला.
“आता कुठेही घालमेल नाही तर काही संदेश नाही. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संधी दिली आहे. मला त्यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं आहे त्यामुळे मी फार आनंदी आहे”, असंही मिलिंद देवरा म्हणाले.