लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. आतापर्यंत देशभरात ५ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. अजून दोन टप्पे शिल्लक आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होऊन देशात कोणाचे सरकार येणार आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान यावेळी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी खास लोकांना मतदान करण्यासाठी मतदारांना धमकी दिली जात असल्याचा आरोप केला आहे.
एक गट फतव्यांच्या नावाने तर दुसरा गट भारतीय जनता पक्षाच्या नावाने धमकावत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. मेहबूबा मुफ्ती या संदर्भात बोलताना म्हणाल्या, ”मी राजौरी येथे अनेक शिष्टमंडळाला भेटले. तिथे असलेली स्थिती प्रचंड भीतीदायक आहे. एका गटाकडून धार्मिक फतवे जारी केले जात आहेत की, जर का तुम्ही एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत दिले नाहीत तर, तुम्हाला नरकात जावे लागेल.”
“दुसरा गट भाजपच्या नावाने लोकांना ब्लॅकमेल करत असताना आम्ही ऐकले आहे. तसेच अनेक अधिकाऱ्यांना विशिष्ट उमेदवाराला मतदान करा नाहीतर तुम्ही बदली केली जाईल अशी धमकी दिली जात आहे. पण भाजपलाही उमेदवार माहित आहेत, ते मते मागत आहेत. त्यांचे डिपॉझिट जप्त होतील.” पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (पीडीपी) प्रमुख अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.