दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात राष्ट्रीय राजधानीच्या राजीव चौक आणि पटेल नगर मेट्रो स्टेशनमध्ये जीवानिशी मारण्याची धमकी लिहिल्याबद्दल बुधवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे,
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित गोयल (३३) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बरेली येथील रहिवासी आहे.आरोपी हा उच्चशिक्षित असून एका नामांकित बँकेत काम करतो. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
तसेच आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसून येत असले तरी वैद्यकीय तपासणीनंतरच याची पुष्टी होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांच्या मेट्रो युनिटने एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
यापूर्वी आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला होता.
राष्ट्रीय राजधानीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना आप खासदार संजय सिंह म्हणाले, “अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. भाजप आता अरविंद केजरीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचत आहे. राजीव चौक आणि पटेल नगर मेट्रो स्टेशनवर केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याची धमकी थेट पंतप्रधान कार्यालयातून रचली जात आहे.
“जर अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार असेल”, असाही आरोप ‘आप’ने केला आहे.