झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्डरिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे सध्या ईडी कोठडीत आहेत. दरम्यान त्यांनी जामीन लावण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांना हा मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीसाठी जामीन मिळावा अशी याचिका त्यांनी दाखल केली होती. मात्र कोर्टाने ही विनंती फेटाळली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही निवडणूक प्रचारासाठी जामीन देण्याची कोर्टाला विनंती केली होती. मात्र हेमंत सोरेन यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सोरेनची बाजू मांडणारे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी सांगितले की, ते २ जून रोजी आत्मसमर्पण करतील, परंतु सुनावणीदरम्यान ईडीने याला विरोध केला.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बेकायदेशीर खाण प्रकरण तसेच राज्याची राजधानी रांची येथील कथित जमीन घोटाळ्याच्या संदर्भात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली चौकशी केली जात आहे. ईडी या दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून सुमारे 8.5 एकर मालमत्तेवर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप आहे. सोरेन यांच्यावर जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोपही केला आहे.