Swati Maliwal : स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरणाचे गूढ अद्यापही उकललेले नाहीये. तसेच दिल्ली पोलीस या घटनेतील आरोपी बिभव कुमारला घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत. अशातच आता स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी नवा खुलासा केला आहे.
स्वाती मालीवाल यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक ट्विट शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी अनेक मोठे दावे केले आहेत. स्वाती यांनी लिहिले की, काल मी एका मोठ्या नेत्याशी बोलले, ज्यांनी मला सांगितले की सर्वांवर दबाव आहे. गलिच्छ बोलणे आणि माझे वैयक्तिक फोटो लीक केल्याप्रकरणी स्वातीविरोधात आदेश देण्यात आले आहेत. तसेच मला पाठिंबा देणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असे बोलले जात आहे.
स्वाती यांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांना या प्रकरणाशी संबंधित काम देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, पत्रकार परिषद घेण्यापासून ते माझ्याविरोधात ट्विट करण्यापर्यंत. अमेरिकन स्वयंसेवकांना माझ्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सांगितले आहे. याशिवाय बनावट स्टिंग ऑपरेशनच्या सूचनाही प्राप्त झाल्या आहेत.
नाव न घेता स्वाती यांनी लिहिले की, तुम्ही हजारोंची फौज उभी करू शकता पण मी एकटीच सर्वांचा सामना करेल कारण सत्य माझ्यासोबत आहे. स्वातीच यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांबद्दल त्यांना कोणताही राग नाही कारण आरोपी एक शक्तिशाली माणूस आहे. त्या व्यक्तीला सर्वात मोठा नेताही घाबरतो आणि त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस कोणाचेच नाही, असे स्वाती यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, मला कोणाकडूनही मदतीची अपेक्षा नाही. मी माझ्या स्वाभिमानासाठी लढा सुरू केला आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहीन. या लढ्यात मी एकटी आहे पण हार मानणार नाही.